Sunday, May 19, 2024
No menu items!
HomeBusiness Infoव्यवसाय मार्गदर्शन: शिवणकला

व्यवसाय मार्गदर्शन: शिवणकला

भारतात एकूण लघुउद्योगांपैकी कमीतकमी नऊ टक्के उद्योग हे आजही महिलांच्या मालकीचे आहेत. जेव्हा प्रत्येक युवक-युवती स्वतःच्या नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न करेल तेव्हा खऱ्या अर्थाने देश प्रगतीपथावर जाईल. सर्वांमध्ये काहीनाकाही कौशल्य असते, फक्त गरज आहे त्या कौशल्याचा शोध घेण्याची.

शिक्षणामुळे प्रगती होते आणि त्याचा उपयोग करून स्वकमाईतून व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून घरगुती व्यवसाय उभा राहू शकतो. काहीजण वेळीच सुरुवात करून स्वतःला स्वयंसिद्ध करतात. त्यातलाच एक कौशल्यपूर्ण व्यवसाय आहे ‘शिवणकाम’.

एकेकाळी शिवणकाम घराघरात शिकले जायचे. मुलींनी शिवणकलेचे शिक्षण घ्यावे असा प्रत्येक आईवडिलांचा आग्रह असायचा. शिवणकाम करून स्वतःच्या पायावर उभे राहता येईल हा यामागील उद्देश होता.

सध्या वेगवेगळ्या डिझाईनच्या कपड्यांची बाजारात चलती आहे. आजही शहरात तसेच ग्रामीण भागात चांगल्या कारागिराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एक छोटी जागा आणि एक शिलाई मशीन याद्वारे हा व्यवसाय सहज सुरु करता येतो.

आज जवळपास प्रत्येक गृहिणीकडे शिलाई मशीन असते. अनेक महिला शिवणकाम करून आपला व्यवसाय समर्थपणे करीत आहे. त्यात प्रामुख्याने साडीला पिको-फॉल लावणे, विविध डिझाईनचे ब्लाउज शिवणे, लहान मुलांचे कपडे, मुलींचे फ्रॉक, पंजाबी ड्रेस, सलवार-कमीज शिवणे, कापडी पिशव्या शिवणे, घरातील कपड्यांवर शिलाई करणे आदी व्यवसाय करीत आहे. सद्या ब्लाऊजची शिलाई अडीचशे रुपयांपासून ते सहाशे रुपयांपर्यंत आहे.

आजही शिवणकामाचे अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शासकीय तसेच खासगी आयटीआयमध्ये एक वर्षाचा शिवणकामाचा अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यासाठीची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. ड्रेस मेकिंग किंवा शिवणकामाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था जिल्हाभर कार्यरत आहेत.

प्रत्येक कुटुंबाला जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली टेलरही असतो. रेडीमेड कपड्यांच्या जमान्यातही टेलरिंग व्यवसायाने मात्र आपले स्थान आजही अबाधित ठेवले आहे.

एकेकाळी शर्ट साडेतीन तर पॅट दहा रुपयांत शिवून मिळत होती. परंतु आज तोच शर्ट अडीचशे ते पाचशे रुपयांना तर पॅट साडेतीनशे ते सहाशे रुपयांना शिवून मिळत आहे. दरवर्षी दहा ते वीस रुपयांनी यात वाढ होत आहे. काही नावाजलेले टेलर्स तर अठराशे रुपये ड्रेसची शिलाई आकारत आहेत. कारागिराला प्रती ड्रेस अडीचशे ते सहाशे रुपये दिले जातात.

रेडीमेड कपड्यांचा जमाना असला तरी रेडीमेड कपडे प्रत्येकाला आवडतातच असे नाही. आजही चोखंदळ ग्राहक टेलर मास्तरची गुणवत्ता हेरून फिटिंगच्या बाबतीत कुठेही तडजोड न करता ड्रेस शिवून घेत आहेत.

आजही अनेक महिला घरीच शिवणकाम करून चांगली कमाई करीत आहे. घरगुती व्यवसायाचा श्रीगणेशा करण्याची हीच योग्य वेळ आहे, तेव्हा युवक-युवतींनो योग्य निर्णयाचे पहिले पाऊल उचलून संधीचे सोने करणारी प्रगतीची वाट धरायला काय हरकत आहे.

मधुकर घायदार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक 9623237135

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Content Protection is on