Thursday, November 7, 2024
No menu items!
HomeVocational TrainingSkill Education कौशल्य शिक्षण

Skill Education कौशल्य शिक्षण

भारताला येत्या काळात सुमारे पाच कोटी व्यवसाय कौशल्य असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची विविध क्षेत्रात गरज आहे. एकटया महाराष्ट्रात ५० लाख व्यवसाय कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची गरज आहे. परंतु अशा कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाचा दुर्देवाने तुटवडा आहे.

कौशल्य विकास हा शिक्षणाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. यासाठी समाज आणि शिक्षण क्षेत्रात कौशल्य विकास म्हणून काय बदल करायचे यावर विचार करायला हवा.

सध्या औद्योगिक मंदी आणि यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस नोकऱ्यांच्या संख्येत बदल होत आहे. औद्योगिक जगताच्या मागणीनुसार शैक्षणिक अभ्यासक्रम निश्चित करावा लागेल. नोकरी संदर्भात येणाऱ्या जाहिरातींची मागणी वेगळी असते आणि मुलांचे प्रशिक्षण वेगळे असते. असे चित्र दिसते. अंगी कौशल्य असले की स्पर्धेच्या युगातही रोजगाराच्या अनेक वाटा निर्माण होतात. त्यासाठी कौशल्य शिक्षणाची गरज आहे.

प्रत्येक मुलाला आणि कोणत्याही मुलाला उत्तम ऐकता येणे, बोलता येणे, वाचता येणे आणि लिहिता येणे या माध्यमातून जगण्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा आत्मविश्वासपूर्वक निवडता येणे, यालाच गुणवत्तापूर्ण कौशल्यवर्धित शिक्षण म्हणता येईल. यात मुलांमधील कल्पकतेला वाव मिळणे, हाताने काही करण्याची उर्मी निर्माण होणे, उत्साहपूर्वक वातावरण असणे, निर्भयता अंगी येणे यांसारख्य अनेक गोष्टी येतात.

शिक्षण या शब्दाची व्याख्या, स्वरूप वेगळं असल्यामुळे पूर्वी जी मंडळी तथाकथित शिक्षणप्रवाहात नसली, तरी त्यांनी जे (अनेक क्षेत्रात) उभं केलं ते कदाचित त्या अर्थाने शिकलेली मंडळी करू शकत नाहीत असं लक्षात येतं. अनुभव संशोधन निर्मिती, नोंदी, भूमिका अशा अनेक गोष्टी या संदर्भात महत्त्वाच्या आहेत. पूर्वी विविध प्रकारची कौशल्य माणसाच्या अंगी होती. ती पुढील पिढीत देण्याची रचनाही समाजात होती. लहान मुलाला हिशोब पटकन करता येत होता. कागदच नव्हता, छपाई नव्हती तरी प्रचंड मुखोद्गततेच्या स्वरूपात लेखन झालं. हळूहळू वेगवेगळे लोक येत गेले. अनेक गोष्टी आम्ही स्वीकारल्या. यातून संस्कृती घडत गेली. लोककलातून ती साकारू लागली.

 
नेमकी गडबड कुठे झाली? ब्रिटीश आले, येतांना त्यांचे शिक्षण घेऊन आले, जातांना ते ठेऊन गेले.

सरकारी तसेच खाजगी नोकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. आपल्या अपत्याच्या जन्मापासूनच किंवा त्याही आधीपासून आईवडिलांचा विचार चालू होतो, की आपल्या अपत्याने आयुष्यात कोण व्हावे, काय करावे. आई- वडील मंडळींची आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वप्न असतात. अडचणी, वंचना, दारिद्र्य अपघात, अपयश अशा अनेक कारणांनी हि स्वप्ने अपुरी राहिलेली असतात. मग आपल्या मुलाबाळांच्या माध्यमातून ती पुर्ण करण्याची स्वप्ने आईवडिलांना पडतात. आपल्या वाट्याला जे दु:ख, वंचना, अपयश आलं ते आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये, त्यांना काही कमी पडू नये यासाठी आईवडील छाती फुटेपर्यंत पळत राहतात.

पुढे ती मुले मोठी होऊ लागली की, आपल्या आयुष्याचा आपोआपच विचार करू लागतात. बदलते भोवताल आणि बदलत्या परिस्थितीनुसार इंजिन ड्रायव्हर पासून आयएएस अधिकार्यांपर्यंत आणि विराट- रोहित पासून जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या विविध रोल मोडेल्सपर्यंत, मुले स्वतःच्या आयुष्याच्या, करिअरचा विचार करतात.

या सर्व विचाराला व्यावहारिक टोक येऊ लागते, यावे लागते, सर्वसाधारणपणे वय वर्षे १६ आणि इयत्ता १0 वीपाशी. तिथे करिअरचा, आयुष्याचा विचार करण्याची काही सर्वसाधारण सूत्रे, काही ठोकताळे ठरलेले आहेत.

सध्याची करिअर आणि आयुष्याची दिशा ठरवण्याची सूत्र, थोड्याफार फरकाने पुढील प्रमाणे सांगता येतील.

१० वी च्या परीक्षेत खूप (पुरेसे) टक्के मिळाले पाहिजेत. त्यासाठी ९ वी पासूनच क्लासेस, शिकवण्या, व्हेकेशन बच, स्पेशल बच वगैरे वगैरे प्रकार सुरु होतात. जीवनाचे सगळे भवितव्य जणू त्या दहावीतल्या बोर्डाच्या परीक्षेतल्या मार्का-टक्क्यांवरून ठरणार असल्यासारखे. १० वीला खूप टक्के का हवेत? तर ११ वी विज्ञान शाखेला प्रवेश मिळण्यासाठी. आणि ११ वीला सायन्सलाच प्रवेश का हवा तर १२ वीला (भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र) किंवा (गणित) किंवा दोन्ही द्विलक्षी अभ्यासक्रम घेता यावा. आणि १२वीला एवढे पीसीएमबीचे काय पडलेय? तर कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या समाजाने, पालकांनी, समवयीन मित्र- मैत्रीणीनी, विविध धोरणांनी ठरलेय की, वैद्यकीय, अभियांत्रिकी म्हणजेच काय ते चांगले, सर्वात उत्तम, प्रथम प्राधान्याचे करिअर. तिथे प्रवेश न मिळाल्यास बाकीच्या पर्यायांचा विचार करायचा. अशी करिअरची एक उतरंड रचलीय. करिअरची दिशा ठरवण्याची हि सूत्र चुकीची, अशास्त्रीय, मुख्य म्हणजे मुलांवर अन्याय करणारी आहेत.

त्या वैद्यकीय, अभियांत्रिकी अंतर्गतसुद्धा अशीच एक पसंतीक्रमाची उतरंड आहे. तीसुद्धा अशास्त्रीय आणि अन्यायकारक.

उदाहरणार्थ, वैद्यकीय शाखेत पदवी पातळीला पहिला पसंतीक्रम, एमबीबीएस. तिथे प्रवेश न मिळाल्यास आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, आहार फिजिओथेरपी. अशा पर्यायांचा उतरत्या क्रमाने विचार करतात. एमबीबीएसनंतर पदव्युत्तर प्रवेशासाठी अशीच पसंतीक्रमांची उतरंड आहे.

अभियांत्रिकीच्याही पदवी-पदव्युत्तरबाबत अशीच उतरंड आहे. सर्वसाधारणपणे मेकेनिकल, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रोनिक्स नंतर मग सिव्हील, मेटोलर्गी आदि.

अश्या रितीने नववी पासून खूप कष्ट करूनही हवी ती पदवी, हवी ती ज्ञान शाखा मिळाली नाही तर त्या मुला-मुलीला, त्यांच्या आई वडिलांना, नातेवाईकांना वाटते जणू आता या मुलाला काही भवितव्यच नाही आणि हा मुलगा हुशार नाहीये. मग आता विज्ञान शाखेमध्ये प्रवेश मिळवा!

पण दहावीलाच विज्ञान शाखेला प्रवेश मिळविण्याइतके गुण नसतील तर? कारण दरवर्षी निकाल लागले कि महाविद्यालयाचे कटऑफ जाहीर होतात. विज्ञान शाखेचा प्रवेश ९३ टक्क्याला बंद, वाणिज्यचा ८९ टक्के, कलाचा ८३ टक्के.

मग १० वी च्या टक्केवारी नुसार मिळेल ती विद्याशाखा आणि मिळेल ते महाविद्यालय.

अखेर १० वीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले कि मग वाणिज्य वा कला शाखा.

नकारात्मकतेवर आधारित आणि न्यूनगंड जोपासणारी ही विचार किंवा निर्णय पद्धती, तरुण पिढीवर अन्याय करणारी आहे.

एखाद्या मुला-मुलींना परीक्षेत कमी गुण मिळालेले असतात पण जीवनाच्या अनेक क्षेत्रांसाठी त्यांच्या अंगात अनेक अनमोल गुण असतात. सर्वप्रथम स्व:ची ओळख करून घ्या. आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखणे व त्यात करिअर करणे. बहुतेकांना दुसऱ्याशी तुलना करण्याची वाईट सवय असते. इतकेच नव्हे तर पुस्तकी शिक्षण थांबल्यानंतर मैदानावर शतक ठोकणे, उत्तम अभिनय करणे, उत्तम गाता येणे, सामाजिक तसेच राजकीय नेतृत्व करणे, उत्तम पत्रकारिता करता येणे, लेखन करता येणे हे सर्व बुद्धिमत्ताच आहे.

शेवटी विषयाचे ज्ञान आणि परीक्षेतील गुण या दोन पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे गुणांवरून आपण मुलगा-मुलगी हुशार आहे कि नाही हे मोजमाप करू लागलो तर ते चुकीचे आहे. शाळा महाविद्यालयामध्ये मोठे होतांना वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग नोंदवितो. कश्यामध्ये जीव रमतो, काय सहजपणाने समजते तेच क्षेत्र विद्यार्थ्याने निवडावे. ज्या क्षेत्रात बुद्धी चालते त्या क्षेत्रातच करिअर करायला हवे.

मधुकर घायदार नाशिक 9623237135

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Content Protection is on