दहावी किंवा बारावीनंतर करिअरच्या वाटा शोधणा-यांपैकी अनेक युवक अभियांत्रिकी शिक्षणाला ‘प्रथम क्रमांका’ची पसंती दर्शवितात. महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पदविका, पदवीचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आज आपण सिव्हिल इंजिनीअरिंग विषयी अधिक जाणून घेऊ.
आज बांधकाम क्षेत्राचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. घर बांधणे किंवा घर घेणे ही सर्वांसाठी महत्त्वाची गरज बनली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात सिव्हिल इंजिनीअरची आवश्यकता भासते. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांचाच सहभाग या क्षेत्राला नेहमी लागत असतो. अशा सहभागी अनेकांपैकी एक म्हणजे ‘सिव्हिल इंजिनीअर’. बांधकाम क्षेत्रात सिव्हिल इंजिनीअरचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय इमारतीचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे हल्ली या क्षेत्राकडे करिअर संधी म्हणून पाहिले जाते.
स्थापत्य अभियांत्रिकी – सिव्हिल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमात प्रामुख्याने बांधकाम क्षेत्राशी संबधित आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य, यंत्रे व मनुष्यबळ, बांधकामाचे सर्वेक्षण, बांधकामाचे नियम, बांधकाम नियोजन, रेखाटन, मंजुरी, संरचना, संचालन, व्यवस्थापन, मूल्यांकन, मोजमाप, देखभाल, दुरुस्ती आदीबाबतचा अभ्यास या शाखेमध्ये करण्यात येतो. बांधकामामध्ये इमारती, रस्ता, लोहमार्ग, विमानतळ, पाणीपुरवठा योजना, मलनि:सारण व सांडपाणी योजना, धरणे व जलस्रोतच्या निर्मिती व उभारणीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेचे मोलाचे कार्य असते. शहर विकास व शहर नियोजनामध्येही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. यात कृषी क्षेत्राशी संबंधित ‘इरिगेशन इंजिनिअरिंग’ अभ्यासक्रम देखील अंतर्भूत असतो.
सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्रात इमारतीच्या उभारणीपासून ते रस्ते, पूल, फ्लायओव्हर्स, स्कायवॉक, रेल्वे इत्यादींचा समावेश होत असतो. प्रत्यक्ष कामाच्या उभारणीसाठी ‘सिव्हिल इंजिनीअर’ची गरज असते. अनेक ज्युनिअर, सिनिअर इंजिनीअर्स, आर्किटेक्ट, डिझायनर्स, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स व सप्लायर्स इमारत उभारणीसाठी महत्त्वाचे असतात. सिव्हिल इंजिनीअरला सर्वांत प्रथम काय काम करायचे आहे हे समजावून घ्यावे लागते. त्यानुसार साहित्याची पूर्तता, लागणारे मजूर इत्यादींची जमवाजमव करून उभे राहून काम करून घेण्याची कला सिव्हिल इंजिनीअरकडे असणे गरजेचे आहे. सिव्हिल इंजिनीरिंगमध्ये इमारतीचा पाया, आरसीसी काम, प्लंबिंग, पेन्टिंग, बांधकाम, प्लॅस्टर, पीओपी, टायलिंग सारख्या अनेक कामांचा समावेश होत असतो. जी व्यक्ती योग्य पद्धतीने कामगारांचा आणि साहित्यांचा समन्वय साधू शकते, तीच व्यक्ती या साईट व्हिजन मानल्या गेलेल्या सिव्हिल इंजिनीअरचे करिअर योग्य रीतीने करू शकते. स्वत: प्रात्यक्षिक केल्याने तसेच साईटवर काम केल्याने सिव्हिल इंजिनीअरचा अनुभव वाढतो व आत्मविश्वास दांडगा होऊन भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होत राहते. पण काळानुसार सिव्हिल इंजिनीअरला कॉम्प्युटर, इंटरनेटचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे कारण ती आजच्या काळाची गरज बनली आहे.
सद्या युवकांना सिव्हिल इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीत सिव्हिल इंजिनीअरची नोकरी देखील करता येते व पुढे जाऊन अनुभव आल्यास स्वतंत्र व्यवसाय म्हणजेच इमारतीच्या बांधकामाचे स्वतंत्र कॉन्ट्रॅक्ट घेऊन ‘बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचा’ व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी आहेच तसेच स्थापत्य अभियंता केंद्रीय लोकसेवा आयोग व विविध राज्यांचे लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या माध्यमांतून भारत सरकार व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांत अधिकारी पदांवर देखील कार्य करू शकतात.
स्थापत्य अभियांत्रिकी शाखा ही कालानुरूप विकसित होत जाणारी असल्यामुळे युवकांनी यात करिअर करून आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावावा हीच अपेक्षा.
मधुकर घायदार 9623237135