Thursday, November 7, 2024
No menu items!
HomeBlogघरीच डिजिटल शिक्षण

घरीच डिजिटल शिक्षण

मुलं जेवढा वेळ टीव्ही पाहतात तेवढा वेळ अभ्यासाला बसत नाही. आजही प्रत्येक घरात हेच चित्र आहे. मुलांचे टीव्ही पाहणं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशा परिस्थितीत टीव्ही पाहणंच जर अभ्यास झाला तर…

आजच्या परिस्थितीत वर्गात बसून शिकवणं आणि शिकणं शक्य नसल्याने होम स्कूलिंगला सुरुवात झाली. लॉकडाऊन मुळे शिक्षण देण्याची आणि घेण्याची पद्धत बदलली आहे. आजच्या परिस्थितीत ॲक्सेस करा आणि शिका ही शिकण्याची उत्तम पद्धत आहे. याच विचार प्रवाहातून दीप (डिजिटल एज्युकेशन एम्पावरमेंट प्रोग्रॅम) फाउंडेशनने तंत्रज्ञानावर आधारित केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग विद्यार्थ्यांना घरबसल्या रंजक पद्धतीने शिकण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.

सदर प्रयोगांच्या मदतीने आपणही आपल्या घरातील  टीव्ही, स्मार्टफोन्स यांसारख्या गॅजेट्स वापर करून आपल्या घरात डिजिटल होम स्कूलिंग सुरू करू शकता.

ऑफलाइन डिजिटल लायब्ररी – आज घराघरात स्मार्ट टीव्ही आहेत स्मार्ट टीव्ही तील अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करून आपण आपल्या घरातच ऑफलाइन डिजिटल लायब्ररी तयार करू शकतो. यासाठी आपल्याकडे जास्त स्टोरेज असलेल्या एखाद्या पेन ड्राइव्ह किंवा हार्ड ड्राईव्ह ची आवश्यकता आहे. पेन ड्राईव्ह किंवा हा ड्राइव्ह मध्ये आपल्या मुलांच्या इयत्तेनुसार फोल्डर वाईज कन्टेन्ट ऍड करून सदर हार्ड ड्राइव्ह किंवा पेन ड्राईव्ह टीव्हीच्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमला जोडा. यानंतर आपल्या स्मार्ट फोनवर d’link हे लोकल नेटवर्किंगचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून हार्ड ड्राइव्ह किंवा पेन ड्राइव्ह मध्ये ठेवलेला कन्टेन्ट आपल्याला ऑफलाइन पद्धतीने ॲक्सेस करता येऊ शकेल. यात वायफाय फक्त माध्यम म्हणून काम करेल. समजा आपण जॉईन फॅमिली मध्ये राहत आहात. घरात चार मुल आहेत जी वेगवेगळ्या इयत्तांमध्ये शिकत आहेत ही चारही मुलं वेगवेगळ्या स्मार्टफोन द्वारे आपापल्या इयत्तेनुसार हार्ड ड्राइव्ह किंवा पेन ड्राइव्ह मध्ये ठेवलेला कन्टेन्ट एकाच वेळी ऍक्सेस करू शकतात.  विशेष बाब म्हणजे डिजिटल लायब्ररी मध्ये शेकडो पुस्तकांचा व व्हिडिओचां समावेश करता येऊ शकतो. फक्त आपण स्टोरेज केलेलाच डिजिटल आशय मुलांना पाहता येतो. कन्टेन्ट एक्सेस करण्याची पद्धत ऑफलाईन असल्यामुळे इंटरनेट किंवा त्याचा गैरवापर या विषयी प्रश्नच उद्भवत  नाही.

घरचा टीव्ही – डिजिटल फळा – मुलं जेवढा वेळ टीव्ही पाहतात तेवढा वेळ अभ्यासाला बसत नाही. आजही प्रत्येक घरात हेच चित्र आहे. आणि लॉकडाऊनच्या काळात तर मुलांचे  टीव्ही पाहणं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशा परिस्थितीत टीव्ही पाहणंच जर अभ्यास झाला तर… यासाठी काही क्लृप्त्या आपल्यासाठी निश्चित उपयुक्त ठरतील. तीन वर्षांपूर्वी घरातील टीव्हीवर मी हा प्रयोग केला होता. टीव्हीच्या स्क्रीनवर एक टच स्क्रीन इंटरफेस लावून टीव्हीची पॅसिव्ह स्क्रीन टच स्क्रीन मध्ये कन्व्हर्ट केली. ज्यामुळे घरचा टीव्ही इंटरॅक्टिवे बोर्ड मध्ये परावर्तीत झाला. घरच्या टीव्हीवर विविध शैक्षणिक ॲप्लिकेशन टचस्क्रीन पद्धतीने हाताळणे त्यातील ऍक्टिव्हिटी पेन टूल ने सोडवणे टीव्हीच्या स्क्रीनवर विविध रंगात लिहिणे, पुसणे, सेव्ह करणे इ. इंटरॅक्टिवे बोर्ड चे सर्व पावरफुल टूल मुलांना घरबसल्या घरच्या टीव्ही वर अनुभवयास मिळाली. सदर इंटर्वेंशन दीप फाऊंडेशन च्या माध्यमातून शेकडो शाळांपर्यंत तसेच अनेक घरांमध्ये पोहचवले गेले आहे. ज्यामुळे  विद्यार्थ्यांना घरबसल्या ॲक्टिविटी बेस डिजिटल लर्निंगचा आनंद घेता येत आहे.

घरच्या टीव्हीचा डिजिटल फळा म्हणून वापर करण्यासाठी आणखी एक साधा प्रयोग आहे ज्यात टीव्हीच्या आकाराची काच घेऊन टीव्हीच्या स्क्रीनवर चिटकवून स्क्रीन वरील ऍक्टिव्हिटी सोडवण्यासाठी साध्या मार्करचा किंवा स्केच पेनचा वापर करता येतो.

घरातील टीव्ही व स्मार्टफोन यांच्या मदतीने घरबसल्या शिकण्याची आणखी एक उत्तम पद्धत म्हणजे स्क्रीन कास्टिंग किंवा स्क्रीन मिररिंग. यात आपल्या स्मार्ट फोनची स्क्रीन टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर वायरलेस पद्धतीने परावर्तित केली जाते. सन 2017 – 18 साली पुणे जिल्ह्यातील माळवाडी या गावातील प्रत्येक घरात सदर प्रयोग केला गेला. यामध्ये प्रत्येक पालकाच्या स्मार्टफोनवर त्याच्या पाल्याच्या इयत्तेनुसार डिजिटल आशय असलेले एप्लीकेशन, ब्रेन चॅलेंजिंग गेम्स व निवडक कंटेंट इन्स्टॉल केला गेला व प्रत्येक घरात स्क्रीन मिररिंगचे प्रात्यक्षिक दिले गेले. आता मोबाईल मधील सर्व कँटेन टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर दिसू लागल्याने संपूर्ण फॅमिली लर्नर झाली. मनोरंजनात जाणारा वेळ शिक्षणासाठी उपयुक्त ठरू लागला. ज्यामुळे आता पालकांना आपल्या पाल्याला दप्तर घेऊन अभ्यासाला बस असं सांगायला लागत नाही. कारण आता टीव्ही पाहणे हाच अभ्यास झाला आहे.

इलेक्ट्रिक टिचींग एड – हलणारी, डोलणारी विविध आवाज करणारी इलेक्ट्रिक खेळणी मुलांना नेहमी आकर्षित करतात. या कारणाने घरोघरी अशी अनेक इलेक्ट्रिक खेळणी आपल्याला सापडतील. अशाच एका इलेक्ट्रिक कारच्या मदतीनं मी बनवलेले टीचींग एड निश्चित आपल्या मुलांना उपयुक्त ठरेल.  चालू स्थितीतील असलेली एक इलेक्ट्रिक कार घेऊन कार चे ऑन ऑफ चे स्विच काढून टाकले व स्विच मधून प्लस आणि मायनस अशा दोन वायर बाहेर काढून वायर च्या दोन्ही टोकांना मल्टीमीटर च्या दोन पिन शोल्डर केल्या गेल्या. त्यानंतर काही  पुठ्ठ्यावर बहुपर्यायी प्रश्नांची प्रश्न पेढी तयार केले गेली. प्रत्येक प्रश्नासमोर व उत्तराच्या पर्याया समोर मेटल पिन लावल्या गेल्या.

पुठ्ठ्याच्या मागील बाजूस प्रश्न व योग्य उत्तर असलेल्या पर्यायाची पिन तारेने जोडून घेतली. ज्यावेळी मुलं मल्टीमीटर च्या पिनच एक टोक प्रश्ना समोरील मेटल पॉईंटवर तर दुसरे टोक उत्तराच्या योग्य पर्यायासमोरील मेटल पॉईंटवर ठेवतात त्यावेळेला कार आपोआपच चालू होते. हा जादुई अनुभव मुलांना खूप व्यस्त ठेवतो. यांसारख्या ऍक्टिव्हिटी मुळे मुलांच खेळणं आणि शिकण एक होऊन जातं. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूकडे शैक्षणिक साधन म्हणून पाहिल्यास अशी अनेक जादुई अनुभव देणारे टिचिंग एड आपण बनवू शकतो आणि मुलांना घरबसल्या रंजकतेने शिक्षणाचे धडे देऊ शकतो. उदा. मिनी प्रोजेक्टर, एज्युकेशनल इलेक्ट्रो ई.

आजच्या परिस्थितीत तंत्रस्नेही पालक म्हणून घरबसल्या मुलांना शिकवण्यासाठी यांसारखे कल्पक प्रयोग आपल्याला करणे आवश्यक आहे. परंतु हे करत असताना तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्वक, नियोजनबद्ध व प्रमाणबद्द वापर होणे गरजेचे आहे. फ्री सोर्स असलेल्या विविध शैक्षणिक डिजिटल आशयाच्या पोस्ट फिरत आहेत. परंतु हा सर्व कंटेंट मुलांना दाखविण्या योग्य आहे का ? याची खातरजमा कुणीच केलेली नाही. या काळात योग्य व दर्जेदार डिजिटल आशय मुलांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून दीप फाउंडेशन व गुरुजी वर्ल्ड यांनी पहिली ते दहावी पर्यंतच्या दर्जेदार कंटेंट असलेले GKlass हे ॲप लॉकडाऊन काळात मोफत उपलब्ध करून दिले आहे. GKlass हे ॲप प्ले स्टोरवर उपलब्ध असून आज पर्यंत 50 हजारहून अधिक विद्यार्थी या ॲप्लिकेशनच्या मदतीने घरी बसल्या डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

घरी डिजिटली शिका.

संदीप गुंड  

संस्थापक अध्यक्ष दीप फाऊंडेशन,

डिजिटल स्कुल संकल्पनेचे प्रणेते,            

सल्लागार, ऑपरेशन डिजिटल बोर्ड

भारत सरकार,

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक. मोबा. 9273480678

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Content Protection is on